पुणे : जागतिक श्रवण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आंबुलकर स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत श्रवण आणि व्हर्टिगो तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शनाचे विविध उपक्रम राबविण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर उपाध्यक्ष डिंपल इंगळे उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल, पुणे शहर उपाध्यक्ष अविचल ललेंद्र आंबुलकर आणि डॉक्टरांच्या संपूर्ण टीमच्या हस्ते शिबिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी अविचल आंबुलकर यांनी आपल्या भाषणात प्रख्यात लेखिका आणि समाजसेविका हेलन केलर यांचा उल्लेख केला. त्यांनी अंधत्व आणि कर्णबधिरत्वावर मात कशी केली आणि त्यांची विशेष शिक्षिका अॅनी सुलिवन यांच्या मदतीने त्यांनी स्वतःला कसे सक्षम बनवले याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर सरचिटणीस सोनाली चौगुले, पुणे शहर सचिव शुभांगी कोंडे, तसेच सिल्वर बर्च हॉस्पिटलचे डॉक्टर आणि पतंजलीचे डॉक्टर युवराज गरदाडे यांसह अनेक तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिल दरेकर यांनी श्रवणशक्तीचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. खरेदी करताना, रस्त्यावर चालताना किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी संवाद साधताना श्रवणशक्ती किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला. तसेच, योग्य तपासणी आणि प्रशिक्षित ऑडिओलॉजिस्टकडून श्रवणयंत्राचा योग्य बसाव व वेळोवेळी देखभाल कशी आवश्यक आहे, हेही त्यांनी सांगितले. ज्योत्सना दाते यांनी आपल्या अनुभवातून स्पष्ट केले की, “जेव्हा आपण स्पष्ट ऐकू शकत नाही, तेव्हा गर्दीतही एकटेपणा जाणवतो.” त्यामुळे श्रवण समस्या लक्षात येताच त्वरित तज्ञांकडून मदत घेणे महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाची सांगता कृतज्ञता ज्ञापनाने करण्यात आली. जागतिक श्रवण दिनानिमित्त आयोजित या शिबिराने नागरिकांमध्ये श्रवण आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण केली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.