भोर : भोर तालुक्यातील वागजवाडी गावात 15 जून 2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लग्नाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादाने हिंसक स्वरूप धारण केले. या भांडणात एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले, तर चौघांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायाबु मारुती मुकणे (वय 40, मजूर, रा. वागजवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आणि त्यांचा भाचा पिंटू पवार घरासमोरील रस्त्यावर बसले असताना आरोपी राम शंकर जाधव, नितीन नारायण मुकणे, समीर शंकर जाधव आणि शंकर जाधव (सर्व रा. वागजवाडी) यांनी त्यांच्याशी वाद घातला. राम जाधव याने सायाबु यांच्या मुलीच्या लग्नाबाबत आक्षेप घेत, “तुझ्या मुलीचे दुसऱ्या मुलाशी लग्न होऊ नये,” असे म्हणत भांडण उकरले. सायाबु यांनी याबाबत आपणच निर्णय घेऊ, असे सांगितल्याने संतप्त झालेल्या राम याने लोखंडी तलवारीने सायाबु यांच्या डाव्या गालावर आणि हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर इतर तीन आरोपींनी सायाबु यांना मारहाण करत शिवीगाळ आणि धमक्या दिल्या. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पिंटू पवार यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात भादंवि कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अंतर्गत गुन्हा क्रमांक 242/2025 नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.