प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी काय ? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. डीपी रस्त्यावरील शुभारंग लाॅन्स येथे या जिल्हानिहाय बैठका होणार असून या भाजपची निवडणुकीसाठीची रणनिती ठरणार आहे. यावेळी ते निवडणुकांची तयारी, पक्षाचे नियोजन तसेच निवडणूक महायुती म्हणून लढणार की स्वबळावर याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या रखडलेल्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर, राज्यभरातील रखडलेल्या पंचायत समिती, नगर पंचायत, नगर परिषदा तसेच महापालिकेच्या निवडणुकांसाठीची पूर्वतयारी सुरू असून प्रभाग रचना, आरक्षण तसेच सभापतींच्या अरक्षणाच्या सोडतीही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर केव्हाही या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, भाजपकडूनही पक्षसंघटन वाढविण्यासह पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकांची तयारी सुरू आहे. याबाबत पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधरणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, शहर व जिल्हा कार्यकारिणीतील महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.