प्रभात वृत्तसेवा पुणे – कर्करोगाच्या उपचारावेळी घेतलेल्या सुट्ट्यांमुळे कामाहून कमी केल्याचा आरोप करीत पुण्यातील एक आयटी कर्मचारी सोमवारपासून कंपनी कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहे. संतोष पाटोळे गेल्या ८ वर्षांपासून स्लम्बरजर (एसएलबी) या फ्रेंच कंपनीत कामाला होते. या वर्षी झालेल्या एका वैद्यकीय चाचणीत त्यांना घशाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी कर्करोगाच्या उपचारासाठी काही महिने सुटी घेतली. सुट्टीहून माघारी आल्यानंतर त्यांना कंपनीने खोटी कारणे देत कामाहून कमी केले, असा त्यांचा आरोप आहे.पाटोळे २०१७मध्ये या कंपनीत फॅसिलिटी मॅनेजर या पदावर कामाला रुजू झाले. एप्रिल महिन्यात झालेल्या वार्षिक आरोग्य तपासणीवेळी त्यांना घशाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी या कर्करोगावर जूनमध्ये उपचार केले, ते कर्करोगासाठी अद्यापही उपचार घेत आहेत. तर जुलैमध्ये ते पुन्हा कामावर रुजू झाले. तर २७ जुलै रोजी त्यांना कामाहून कमी करण्यात आले.पाटोळे यांनी काही आर्थिक व्यवहारादरम्यान प्रक्रिया न पाळल्यामुळे कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्यांना कामाहून कमी करण्यात आले असल्याचे कंपनीने दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे. मात्र, सदर व्यवहार त्यांनी केलेले नसल्याचे पाटोळे सांगतात. कंपनीच्या अहवालानुसार गेल्या तीन वर्षांत त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. जर माझी कामगिरी उत्तम असेल तर मी केलेले व्यवहार तोट्यात कसे असू शकतात? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांच्यावर झालेले आरोप आधारहीन असल्याचे पाटोळे सांगतात. या बेकायदेशीर हकालपट्टीमुळे त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर, करिअरवर, कुटुंबावर वाईट परिणाम झाला आहे. सुरुवातीला ते त्यांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्याची मागणी करीत होते. मात्र, आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे कंपनीने त्यांना झालेल्या दुष्परिणामाची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात एसएलबी कंपनीच्या मानव संसाधन अधिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता या विषयावर कोणालाही बोलण्याची परवानगी नसल्याचे सांगितले.