प्रभात वृत्तसेवा पुणे : “कर्ज हे टाळण्याचं नव्हे, तर समजून घेऊन योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याचं साधन आहे,” असा संदेश देणारं ‘कर्जमुक्त व्हा!’ हे पुस्तक शनिवारी (८ नोव्हेंबर २०२५) पुण्यात प्रकाशित झालं. फिरोदिया हॉल, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘मधुश्री पब्लिकेशन’तर्फे प्रकाशित आणि चार्टर्ड अकाउंटंट अभिजीत कोळपकर लिखित या पुस्तकात कर्जाच्या ओझ्यापासून मुक्त होण्यासाठीचे व्यावहारिक उपाय मांडले आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि ‘सहकार भारती’चे संस्थापक सतीश मराठे तसेच चितळे उद्योगसमूहाचे श्रीकृष्ण चितळे उपस्थित होते.आपल्या मनोगतात श्रीकृष्ण चितळे म्हणाले, “व्यवसाय करताना कर्ज घेणं अपरिहार्य असतं. मात्र कर्ज घेतलं की ते वेळेवर फेडणं तितकंच महत्त्वाचं आहे. बँका आता सहज कर्ज देतात, पण क्रेडिट कार्डच्या जाळ्यात अडकून कर्जबाजारी होऊ नये.” तर सतीश मराठे म्हणाले, “आताची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे आणि फिनटेकमुळे लघु उद्योजकांना वाजवी दरात कर्जसुविधा उपलब्ध होऊ शकतील. कर्ज घेणं आणि फेडणं या प्रक्रियेमुळे देशाचं आर्थिक चक्र गतिमान होतं. मात्र कर्ज वेळेत फेडणं हेच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे.” लेखक अभिजीत कोळपकर यांनी पुस्तकामागील प्रेरणा सांगताना म्हटलं, “प्रत्येकासाठी कर्जाचा अनुभव वेगळा असतो. अनेकांना करिअरच्या सुरुवातीला कर्ज घ्यावं लागतं. योग्य नियोजन आणि वेळेत परतफेड केल्यास तेच कर्ज प्रगतीचं साधन ठरतं. कर्जाचं नीट व्यवस्थापन न केल्यास मात्र ते ओझं बनतं. हे वास्तव अनेकदा पाहिल्यामुळेच ‘कर्जमुक्त व्हा!’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.” प्रकाशक शरद अष्टेकर यांनी सांगितलं, “‘अर्थसाक्षर व्हा!’ हे सीए कोळपकर यांचं आमचं पहिलं मूळ मराठी पुस्तक इंग्लिश, हिंदी, गुजराती, पंजाबी आणि अरेबिकसह अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे. ‘कर्जमुक्त व्हा!’ हे पुस्तकही असंच यश मिळवेल, असा आम्हाला विश्वास आहे.”कार्यक्रमात संपादक अमृता देशपांडे यांनी प्रास्ताविक करून पुस्तकाच्या निर्मितीमागील मेहनतीचा आणि संपादन प्रक्रियेचा उलगडा केला. तर सविता म्हसकर यांनी उत्साही सूत्रसंचालन करत कार्यक्रम रंगतदार केला.