पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने मंगळवार पेठ परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. रमजान उर्फ टिपू आदम पटेल (वय ३३, रा. भाजी बाजार, शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस कर्मचारी हेमंत पेरणे आणि नीलेश साबळे हे मंगळवार पेठेत गस्त घालत होते. कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेेल्या कोंबडी पुलाजवळ पटेल थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस सापडले. पटेल याने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने कोणाकडून आणले ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहेत. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक राहुल मखरे, हेमंत पेरणे, नीलेश साबळे, शशिकांत दरेकर, नितीन जाधव, अनिकेत बाबर, शुभम देसाई, अभिनव लडकत, मयूर भोसले, उमेश मठपती यांनी ही कारवाई केली.