Pune News : पुणे विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणारी स्थायी समितीची पूर्वनियोजित बैठक तहकूब करण्यात आली. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात समितीच्या बैठका घेता येतील का, तसेच कोणत्या प्रकारचे निर्णय घेता येतील, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे मार्गदर्शका सूचना कराव्यात, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीची सभा आठवड्यातून एकदा घेणे आवश्यक आहे. आर्थिक विषयांसह विविध महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णयांसाठी या बैठका महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र, आचारसंहितेमुळे कामकाजावर मर्यादा येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याबाबत स्पष्टता मागितली आहे. महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात शहरासमोरील अत्यावश्यक प्रश्न अधोरेखित केले आहेत. येत्या जुलैमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालख्यांचे पुण्यात आगमन होणार असून त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. तसेच, पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, रस्ते आणि पाणी साचण्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी तातडीचे निर्णय घेणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे अनेकदा सोसायट्या, लोकवस्ती आणि रस्त्यांवर पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. नव्या वसाहतींमध्येही पाणी शिरण्याच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पूर्वनियोजन आणि आवश्यक कामांबाबत निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक कामांना परवानगी द्या… निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमित बैठका आवश्यकतेनुसार संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने घेता येतात. त्यामुळे स्थायी समितीमार्फत केवळ अत्यावश्यक विषयांवर चर्चा व निर्णय घेता येतील का, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेला पावसाळा तसेच जुलैमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालख्यांचे पुण्यात आगमन होत असून त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. मात्र, पुणे विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या स्थायी समिती व अन्य समित्यांच्या कामकाजाबाबत संभ्रम निर्माण झाला असून, अत्यावश्यक विषयांवरील निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शका सूचना कराव्यात, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गुरूवारी होणारी स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली. यावेळी या कामांबाबत समितीच्या बैठकीत अत्यावश्यक सेवांबाबत काय? असा सवाल समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला. मात्र, महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर या बैठकीस नसल्याने स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत विचारणा करावी अशी मागणी केली.