Pune News – इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात सलग दुसऱ्या दिवशी बदल करावा लागला असून, संकेतस्थळाला येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्यास २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पहिली निवडयादी २९ मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी ११ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राज्यभरातील अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अकरावीची नियमित पहिली फेरी गुरुवारी सुरू करण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम नोंदवणे आवश्यक होते. मात्र, गुरुवारी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर ताण आल्यामुळे ते काहीवेळ बंद पडले. त्यानंतर प्रवेश अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरण्यास २३ मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शुक्रवारीही संकेतस्थळाला अडचणी येत होत्या. त्यामुळे पुन्हा सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.