प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला जागतिक अहिंसा दिन पाळला जातो. त्यानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाने बुधवार, १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान गांधी भवन, कोथरूड येथे आठ दिवसांचा गांधी सप्ताह आयोजित केला आहे. उपक्रमाचे हे चौदावे वर्ष असून या काळात विचारप्रवर्तक व्याख्याने, प्रभातफेरी – शांतता मार्च आदींचे आयोजन केल्याची माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली. सप्ताहाचे उद्घाटन बुधवार, १ ऑक्टो. रोजी दुपारी ५.३० वाजता सर्वधर्म प्रार्थनेने होईल. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती न्या. अभय ओक यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार हे प्रमुख पाहुणे असतील. दोन ऑक्टोबरला शुभांगी मुळे यांचे भजन आणि शांतता मार्च होईल. कदम यांचे काश्मीर आणि मी, नीरज हातेकर यांचे अस्वस्थ वर्तमानाचे अर्थशास्त्र, अभिजीत देशपांडे यांचे सत्य-असत्याशी मन केले ग्वाही आदी व्याख्याने होतील. जागतिक नेत्यांवरील चित्रपटांची ओळख करून देणारा दृकश्राव्य कार्यक्रम समीक्षक सुहास किर्लोस्कर सादर करतील. डॉ. जब्बार पटेल यांची मुलाखत होणार आहे. सप्ताहाचा समारोप माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत होईल.