Pune News – देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आता विद्यार्थी आणि पालकांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात दररोज १० ते १५ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आर्थिक व्यवहार, परीक्षा प्रक्रियेतील संशयास्पद हालचाली, प्रश्नपत्रिका गळतीचे धागेदोरे आणि एजंटसह इतर व्यक्तींमधील संपर्क यांची कसून पडताळणी केली जात आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चौकशी करण्यात येत आहे. पेपर कसे फुटले आणि ते कोणाच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले याचा तपास सीबीआय करत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सहभाग असलेले व प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांपासून पेपर देणारे विद्यार्थी आता सीबीआयच्या रडारवर आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी क्लासेस’चे संचालक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली आहे. त्याला पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने नऊ दिवस सीबीआय कोठडी सुनावली आहे. या चौकशीनंतर सीबीआयने मोटेगावकर याच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले होते. या प्रकरणात मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यालाही यापूर्वी अटक करण्यात आली होती. कुलकर्णी याचा परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध असल्याचे तपासातून उघड झाले होते. याशिवाय पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील जीवशास्त्राच्या शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला देखील सीबीआयने अटक केली होती. मांढरेचा वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध असल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्यूटी पार्लर चालक मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तिने मांढरे यांना घरी बोलावले होते. तेथे विद्यार्थ्यांना प्रश्न आणि संभाव्य उत्तरांबाबत माहिती देण्यात आल्याचे तपासात समोर आले. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील धनंजय लोखंडे यालाही अटक करण्यात आली आहे. पालक व विद्यार्थ्यांकडे याचा तपास : – त्यांच्याकडून झालेली आर्थिक देवाणघेवाण – संपर्क साखळी – परीक्षा प्रक्रियेतील भूमिका – नेमके किती प्रश्न त्यांना मिळाले होते