प्रभात वृत्तसेवा पुणे – मूल्यांची जपणूक आणि मूल्यवर्धनास नैतिकता, प्रामाणिकता व सत्याची जोड दिल्यास चांगल्या संपत्तीची निर्मिती होईल. आपले बुद्धीवैभव विदेशी कंपन्यांसाठी खर्च होतेच, पण त्यासोबतच या बुद्धीचा वापर आपल्या देशासाठी अधिक प्रमाणात व्हायला हवा, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी सीए विद्यार्थ्यांना दिला.दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे सीए विद्यार्थ्यांसाठी महालक्ष्मी लॉन्स येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनावेळी जावडेकर बोलत होते. प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले, तुम्ही नव्या काळाचे प्रतिनिधी आहात. सनदी लेखापाल म्हणून व्यवसाय करताना विनम्रता, विश्वासार्हता, खरेपणा आणि व्यावसायिक शिस्तीचे पालन करा. जिज्ञासा आणि सतत शिकण्याची वृत्ती जागी ठेवा.’आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी सनदी लेखापालांना ‘देशाचे आर्थिक लढवय्ये’ संबोधले, तर संजीवकुमार सिंघल यांनी सीए हे ‘देशाचे ग्रोथ इंजिन’ असून, त्यांनी रोजगारनिर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. एस. बी. झावरे यांनी व्यावसायिक मूल्यांशी तडजोड न करण्याचा सल्ला दिला. पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार यांनी नवकल्पनांसोबत ‘मानवी चेहेरा’ जपण्याचे आवाहन केले. परिषदेच्या समन्वयिका प्रज्ञा बंब यांनी ‘अग्रिया’ या संकल्पनेविषयी माहिती दिली.