वाल्हे : बँक ऑफ महाराष्ट्र वाल्हे (ता.पुरंदर) शाखेची सेवा मागील आठवड्यापासून विस्कळीत झाली आहे. यामुळे बँकेच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून पैसे काढण्यास असंख्य अडथळे निर्माण होत आहेत. वाल्हे येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र अशा दोन बँक आहेत.या दोन्ही बँकेमध्ये, वाल्हे व पंचक्रोशीती पिंगोरी, हरणी, मांडकी, दौंडज, पिसुर्टी, राख आदीं ठिकाणाच्या अनेकांची बँक खाते या दोन्ही बँकेमध्ये आहेत. या परिसरामधील अनेक जण जेजुरी औद्योगिक वसाहतिमधील कंपनीमध्ये कामाला आहेत.या सर्वाचे मासिक पगार बँकेमध्येच जमा होतात.तसेच येथील दूध उत्पादन शेतकरीवर्गाचे दुधाचे पगारही बँकेमध्ये जमा होतात.तसेच लाडकी बहीण योजणा, पीएम किसान योजना, निर्धार योजना आदिंसह अनेकांची बँक खाती आहेत. लोकसंख्येचा दृष्टीने मोठा परिसर तसेच मोठा कामगारवर्ग असलेल्या ठिकाणीच्या बँक ऑफ महाराष्ट्रची सेवा ठप्प झाली असल्याने अनेक ग्राहकांना बँकेत व्यवहार करताना अडथळे येत आहेत. यामुळे अनेकांना ताटकळत राहावे लागत आहे. तसेच बँक महाराष्ट्रचे एटीएमची सेवाही मागील काही दिवसांपासून ठप्प आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून पालखी महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून येथील रस्त्याच्या लगतच गेलेल्या बहुसंख्य केबल तुटत असल्याने मागील काही दिवसांपासून असे अडथळे येत आहेत. असे काहीजण सांगता आहेत. वाल्हेपासून जेजुरी 14 किलोमीटर, तर नीरा 11 किलोमीटर अंतरावर आहे. येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा विना अडथळा सुरू आहेत. वाल्हे येथील शाखेचे कामकाजास मागील काही दिवसांपासून काही तात्रिंक अडचण येत असल्याने शाखेतील गर्दी वाढत आहे. शाखेस बीएसएनएल व ऐरटेल अशा दोन्ही कंपनीचे नेटवर्क सेवा असून यांचे नेटवर्क शाखेस उपलब्ध होण्यास अडथळे येत आहेत. यामुळे शाखेच्या कामकाजास अडथळे निर्माण होत आहेत; यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. लवकरच ग्राहकांची होणारी गैरसोय दुर करण्यात येईल; ग्राहकांनी सहकार्य करावे. – विशाल जाधव, शाखाप्रमुख, वाल्हे