Pune News – जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने मार्गी लावण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर दीडशे खासगी भूमापक नेमण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, आता हाच पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवला जाणार आहे. याअंतर्गत राज्यभरात तब्बल १,५०० खासगी भूमापकांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या नवीन नियुक्ती प्रक्रियेमुळे राज्यातील जमीनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, अर्ज केल्यानंतर अवघ्या महिनाभरात जमीन मोजणीचे प्रकरण निकाली काढण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. या खासगी भूमापकांची निवड केल्यानंतर त्यांना थेट कामावर न पाठवता प्रशिक्षण दिले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये या सर्वांना ३ महिन्यांचे तांत्रिक व प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाईल. ही प्रशिक्षण प्रक्रिया आणि नेमणूक पूर्ण होण्यासाठी साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्यानंतर हे भूमापक प्रत्यक्ष मैदानावर उतरतील. या सर्व नेमणुका एकवट मानधनावर केल्या जाणार आहेत. राज्यातील प्रलंबित प्रकरणांचा भार हलका करण्यासाठी जिल्ह्यांच्या व्यापावरून भूमापकांची संख्या ठरवली गेली आहे. मोठ्या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १०० खासगी भूमापक दिले जातील, तर छोट्या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ५० खासगी भूमापकांची नियुक्ती केली जाईल, असेही भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले पुण्यासाठी आणखी ४० भूमापक पुणे शहर आणि जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या अर्जांची वाढती संख्या विचारात घेऊन येथे विशेष लक्ष दिले जात आहे. पुण्यात यापूर्वीच एका एजन्सीमार्फत ५० भूमापक कार्यरत आहेत; परंतु कामाचा ताण पाहता भूमिअभिलेख विभागाने पुण्यासाठी आणखी ४० खासगी भूमापक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.