Pune News – प्रेमसंबंध तोडल्याच्या कारणातून एकाने तरुणीसह तिच्या मित्रावर ॲसिड हल्ला केला. यामध्ये तरुणी ४५ टक्के भाजली असून, तिचा मित्र देखील ७५ टक्के भाजला आहे. दोघांवर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कर्नाटकातील हुबळी येथून आरोपी श्रीराम मधु सरूनवर (२०,रा.तोणवाला बैतुल, जि.अमला मद्यप्रदेश) याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री ०१:४५च्या सुमारास ताडीवाला रोडवरील जनता महाविद्यालय शाळेजवळ घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तरुणी आणि आरोपी श्रीराम हे दोघे एकमेकांचे नातेवाईक असून, मुळचे मध्यप्रदेशातील आहेत. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, २०२५ मध्ये वाद झाल्याने तरुणीने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेताला. यानंतरही तो सतत पाठलाग करून तिला त्रास देत होता. तिने त्याच्या विरुद्ध मध्यप्रदेशात एक तक्रार देखील दाखल केली होती. तेंव्हापासून तो तिच्यावर चिडून होता. दरम्यान, तरुणीचे भोपाळमध्ये काम करत असताना आदर्श पांडे नावाच्या तरुणासोबत मैत्री झाली. आरोपी श्रीरामला दोघांमधील नात्याबाबत माहिती झाली होती. तरुणी व तीचा मित्र २०२६ मध्ये पुण्यात आले. ताडीवाला रोड येथे ते लिव्हइनमध्ये राहून एका बारमध्ये काम करीत होते. श्रीराम तरुणीला फोनवरून धमकी देत होता. तु माझी नाही तर कोणाचीच नाही, असे बोलत होता. आरोपीने रस्त्यातच गाठले… बुधवारी (दि. २०) मध्यरात्री ०१:४५ च्या सुमारास रेस्टॉरंटमधील काम संपवून दोघे चालत घरी निघाले होते. श्रीरामने दोघांना जनता विद्यालय शाळेजवळ गाठले, त्याने तरुणीवर ॲसिड हल्ला केला. आदर्श याने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या अंगावरही श्रीराम याने ॲसिड फेकले. पाठीवर, हाताला, पायाला गंभीर इजा झाल्याने तरुणी कोसळली. श्रीराम याने तेथून पळ काढला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तरुणी आणि तिच्या मित्राला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांकडून वेगाने तपास… पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तेव्हा तो रेल्वेस्टेशनवरून चालुक्य एक्सप्रेसमध्ये बसून गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना सापडू नये म्हणून त्याने तीन वेळा आपला पेहराव बदलला. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस कर्चमारी सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, तानाजी देशमुख यांच्या पथकाने श्रीराम याला हुबळी कर्नाटक येथून ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राम राजमाने, सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शऩाखाली पथकाने केली.