पुणे : मागील आठवडयात खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसरातील विठ्ठलवाडी, निंबजनगर भागात पूरस्थिती उद्भवली होती. या पूरामुळे जवळपास दिडशेंहून अधिक घरांंमध्ये पाणी घुसले होते. या भागात पुन्हा पूर स्थिती उद्भवू नये यासाठी तातडीनं पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिले. तसेच निळ्या पूर रेषेतील (ब्लू) लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना हे निर्देश दिले.मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कायमस्वरूपी पुनर्वसन करावे एकतानगर, सिंहगड याठिकाणी निळ्या पूर रेषेत सुमारे 3 लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. याठिकाणी एफएसआय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत, असे त्यांनी निदर्शनास आणले. मुख्यमंत्र्यांनी यावर याठिकाणी विशेष दर्जा देऊन पुनर्विकासाचे काम करावे. तसेच तसा आराखडा तयार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. वाहनांची नुकसान भरपाई द्या पूर परिस्थितीत पुण्यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले. पण नियमांमुळे नुकसान भरपाई मिळत नाही असे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी यावर पुणे पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना विमा कंपन्यांशी एकत्रितपणे बोलून यावर मार्ग काढण्यास आणि तातडीने वाहनधारकांना नुकसान भरपाई मिळावी अशा सूचना केल्या आहेत.