प्रभात वृत्तसेवा पुणे – आपल्या देशात ज्ञानाचा आणि विद्येचा मोठा वारसा असूनही, महत्त्वाच्या कामांचे, ज्ञानाचे योग्य दस्तऐवजीकरणाचा अभाव ही व्यवस्थेतील मोठी उणीव आहे, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली. या त्रुटीमुळे आपल्या इतिहासाची माहिती घेण्यासाठी परदेशी प्रवाशांच्या नोंदींवर, इंग्रजांनी लिहिलेल्या इतिहासावर अवलंबून राहावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात राजेश पांडे लिखित युवा भारताच्या लोकसहभागाची गिनीजगाथा या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, उद्योजक कृष्णकुमार गोयल, विशाल चोरडिया, किरण ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तक्षशिला जगातील पहिले विद्यापीठ आपण मानतो. अडीच हजार वर्षांपूर्वी तेथे स्थापत्य, भूगोल, ज्योतिषशास्त्र, शल्यचिकित्सा, गणित अशा सर्व प्रकारचे ज्ञान, ग्रंथ उपलब्ध होते. मात्र, त्याची माहिती आपल्याला ह्युएन त्सांग या चिनी प्रवाशाने केलेल्या नोंदींवरून घ्यावी लागते. केलेल्या कामाचे आपण दस्तऐवजीकरण केले नाही, किंवा केले असल्यास ते योग्य पद्धतीने जतन केले नाही. दस्तऐवजीकरण न केल्यामुळे इंग्रजांनी लिहिलेला इतिहासच वाचावा लागतो. एवढेच नव्हे, तर देश स्वतंत्र झाल्यानंतरही इतिहासाचे पुनर्लेखन आणि पुनरुज्जीवन योग्य प्रकारे झाले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नवा विश्वविक्रम शांतता पुणेकर वाचत आहेत, या संकल्पनेवर आधारित, वाचन चळवळीत सहभागी झालेल्या वाचकांचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र वापरून मराठी देवनागरी लिपीत पुस्तक या शब्दाची प्रतिकृती उभारण्यात आली. या उपक्रमासाठी तब्बल १७,००१ वाचकांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला असून, या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सव, कोहिनुर ग्रुपने, खडकी शिक्षण संस्था आणि टी. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे.