Pune News : पोलीस भरती झाल्याचे सांगून एका तरुणाने सोसायटीत पेढे वाटले, तसेच अभिनंदन करणारा फलक चौकात लावला. नऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तरुणाचे अभिनंदन करण्यासाठी गेले. तेव्हा तरुणाने समाजात प्रभाव पाडण्यासाठी पोलीस भरती झाल्याचा फलक लावून सोसायटीत पेढे वाटल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ऋषीकेश राजू जाधव (२६, रा. तिडके डेअरीजवळ, नऱ्हे) असे गु्नहा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला तरुणाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहेत. त्याला पोलीस दलात भरती व्हायचे होते. मात्र, उंची कमी असल्याने त्याचे पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला व्यवसायावर लक्ष केंद्रीत करुन लग्नाचा विचार कर, असे सांगितले. त्यानंतर पोलीस भरतीचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाने काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांना पोलीस दलात भरती झाल्याचे सांगितले. भरती प्रक्रियेत निवड झाल्याचे सांगून त्याने सोसायटीत फलक लावले, तसेच दोन दिवसांपूर्वी चौकात स्वत:चे अभिनंदन करणारा फलकही लावला. फलकावर तरुणाचे छायाचित्र, पोलीस दलाचे बोधचिन्ह होते. तरुणाने समाजमाध्यमात पोलीस गणवेशातील छायाचित्र ठेवले. त्यानंतर नऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले. चौकशीत तरुणाची पोलीस दलात निवड झाली नसल्याचे उघड झाले.