Pune News : पुण्यातील भेकराईनगर येथे आज (२५ ऑगस्ट) आमदार सदाभाऊ खोत यांच्या भेटीदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत दाखल गुन्हा क्रमांक ३०६/२०२५ अंतर्गत जप्त केलेली जनावरे द्वारकाधीश गोशाळेत जमा असल्याची माहिती होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ही जनावरे अर्जदारांना परत द्यावीत म्हणून खोत पोलिस अधिकारी व काही शेतकऱ्यांसह तेथे पोहोचले होते. गोशाळेत गेल्यावर संबंधित जनावरे तेथे नसल्याचे आढळले. यानंतर आमदार खोत मीडियाशी बोलत असताना गोरक्षक ऋषिकेश कामटे यांच्यासह काही जणांनी आपले म्हणणे ऐकून घेण्याचा आग्रह धरला. खोत तेथून निघून जात असताना या गोरक्षकांचा आग्रह वाढल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस अधिकारी सपोनि चव्हाण, पोउपनि मालुसरे, पोनि खांडे, सपोनि जाधव व स्टाफ यांनी घटनास्थळी हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात ठेवली. पोलिसांच्या तत्परतेमुळे धक्काबुक्कीचा कोणताही प्रकार घडला नाही आणि ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली. घटनेनंतर आमदार खोत यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना माझ्यावर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे. गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी तयार झाली आहे. यावर सरकारने कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशनसमोर छावण्या उभारू,” असा इशारा त्यांनी दिला.