पुणे – नगरसेवक, गटनेता, सभागृह नेता आणि आता निवडणूक प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या गणेश बिडकर यांचा राजकीय प्रवास ‘प्रभागातून शहराकडे’ असाच झाला आहे. सक्रिय राजकारणात येऊन गणेश बिडकर यांना २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘प्रभात’शी बोलताना त्यांनी पक्षातील जुन्याजाणत्या नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रभाग २४ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले बिडकर २००२ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून गेले. दुसऱ्यांदा निवडून गेल्यानंतर २०११ ते २०१२ दरम्यान बिडकर यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले. महापालिकेत सत्ता नव्हती, स्थायी समितीत भाजपाचे तीनच सदस्य होते, तरीही मुत्सद्दीपणामुळे अध्यक्षपद मिळाल्याचे बिडकर यांनी सांगितले. या काळात श्री नागेश्वर आणि त्रिशूंड गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार, कमला नेहरू रुग्णालयाच्या कामास गती दिल्याचे ते म्हणाले. तिसऱ्या टर्ममध्ये गटनेतेपद मिळाले. नागरिकांचा प्रशासनाशी संवाद साधणारा दुवा म्हणून गटनेता म्हणून सातत्याने निधी मिळवित प्रभागातील कामे मार्गी लावली. मेट्रो, ‘जायका’ या प्रकल्पांना मंजुरी मिळाली. २०२० ते २०२२ दरम्यान सभागृह नेता झालो. या संधीचाही मला फायदा झाल्याचे बिडकर म्हणाले. सर्वपक्षीय नेत्यांमध्ये समन्वय घडवणे, विषयाला मंजुरी मिळविण्यासाठी व्यूहरचना आखत चोवीस तास पाणीपुरवठा, नदी पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन, मेट्रोसारख्या प्रकल्पांना गती दिल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंचवीस वर्षांत भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्षनेतृत्वाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी निष्ठेने पार पाडली आहे. मागे वळून पाहताना माझ्यावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते, नागरिक, सहकारी आणि पक्षनेतृत्व यांच्याविषयी कृतज्ञता दाटून येते. – गणेश बिडकर