Pune News : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ऑगस्ट २०२६ सत्राच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या दोनच दिवसांत म्हणजेच २२ मेच्या सायंकाळपर्यंत १३ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, १० हजार ९४२ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. १ हजार ३७ जणांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज, शुल्क आणि कागदपत्र पडताळणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १ जूनपासून विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म’ भरता येतील, तर दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर सविस्तर वेळापत्रक जाहीर होईल. यंदा खुल्या प्रवर्गासाठी १५० रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे. राज्यातील एकूण १,००४ आयटीआय संस्थांमधील १,५७,६६४ जागांसाठी ही प्रक्रिया होत असून, यात ४१८ सरकारी संस्थांमधील ९७,०८८ जागा आणि ५८६ खासगी संस्थांमधील ६०,५७६ जागांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही आयटीआयमध्ये मूळ कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करावा लागेल. तसेच मार्गदर्शनासाठी दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत सर्व आयटीआयमध्ये मोफत सत्रांचे आयोजन केले आहे.