Pune : नीट परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा कृषांग जोशी देशात तिसरा

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट या प्रवेश परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात राजस्थानमधील महेश कुमार हा देशात पहिला आला आहे.
इंदोर येथील उत्कर्ष अवधिया हा द्वितीय, तर महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी हा तिसरा क्रमांक मिळविला आहे. पहिल्या दहामध्ये फक्त एक मुलगी आहे. दिल्लीची अविका अग्रवाल हिने मुलींमध्ये अव्वल तर देशात पाचवा क्रमांक पटकावला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) नीट परीक्षा देश व परदेशात दि. ४ मे रोजी घेण्यात आली. देशातील एकूण ५ हजार ४६८ केंद्रात आणि देशाबाहेरील १४ शहरात ही परीक्षा झाली. या प्रवेश परीक्षेसाठी एकूण २२ लाख ७६ हजार ६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ लाख ९ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून १२ लाख ३६ हजार ५३१ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एकूण १ लाख ८ हजार जागा उपलब्ध आहेत, त्यापैकी सुमारे ५६ हजार जागा सरकारी रुग्णालयांमध्ये आणि सुमारे ५२ हजार जागा खासगी महाविद्यालयांमध्ये आहेत. नीट परीक्षेद्वारे एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, युनानी या विषयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केला जातो.
राज्यातील सव्वा लाख विद्यार्थी पात्र…
महाराष्ट्रातून नीट परीक्षेसाठी २ लाख ४८ हजार २०२ नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ४२ हजार ८५८ विद्यार्थी परीक्षा दिली. त्यातून १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली. देशात पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
देशातून तिसरा व महाराष्ट्रातून पहिला आलेला पुण्याचा कृष्णांग हा मुळचा उत्तराखंडचा आहे. त्याचे शालेय शिक्षण मुंबई व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. दहावीला सीबीएसई माध्यमातून ९४.८ टक्के गुण मिळविले आहेत. विमानगनर परिसरात राहणारा कृष्णांग हा महावीर ज्युनिअर काॅलेजचा विद्यार्थी आहे. या यशाबद्दल तो म्हणाला की, अकरावी व बारावी या दोन वर्षात फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. दिवसभर शिकवणी वर्गात तयारी केल्याानंतर घरी न चूकता अभ्यास सुरू ठेवला. स्व अध्ययनात जास्त प्राधान्य दिले. आता दिल्ली येथील एम्समध्ये एमबीबीएसला प्रवेश घेणार आहे.





