Pune Navale Bridge Speed Limit : पुणे शहराच्या वाहतूक विभागाने कात्रज बाह्यवळण मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहनांच्या अति वेगामुळे वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन, रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी ही पाऊल उचलण्यात आले आहे. कात्रज बायपास मार्गावरील भुमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेवटपर्यंतच्या मार्गावर ही नवीन वेगमर्यादा लागू होणार आहे. या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा ३० किमी/तास इतकी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, इ.) यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. यापूर्वी या रस्त्यावरील वेगमर्यादेबाबत असलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक २५/११/२०२५ पासून लागू करण्यात येत आहेत. उल्लंघन केल्यास कारवाई – या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर CCTV आणि स्पीड गन प्रणालीद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल. वाहतूक सुरक्षित, सुरळीत ठेवणे, आणि अपघाताचे प्रमाण व वाहतूक कोंडी कमी करणे हे या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुण्याचे पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (ए) (बी), ११६(४) आणि ११७ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत. चालकांनी आपल्या वाहनाचे स्पीडोमीटर नियमित तपासावे आणि रस्त्यावरील बोर्डिंग व चिन्हांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.