पुणे – रस्ते खोदा… नव्याने तयार करा आणि तयार झाला की पुन्हा खोदा..या धोरणाची “प्रामाणिकपणे’ अंमलबजावणी पालिका करत आहे! हा प्रकार पुणेकरांनी कर म्हणून भरलेल्या पैशांवर सुरू आहे. त्याचाच आणखी एक नमुना सदाशिवपेठेत समोर आला आहे. येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी नव्याने तयार केलेला खुन्या मुरलीधर मंदिर चौकातील रस्ता खासगी केबल कंपनीने खोदला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेनेच ही परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. खोदाई सुरू होण्याआधी केबल टाकता येत नव्हती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या दीड वर्षांपासून मध्यवर्ती पेठांमध्ये सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणास्तव खोदाई सुरू आहे. मागील वर्षी तर भर पावसाळ्यात या भागात रस्ते खोदाई सुरू होती. त्यानंतर केलेली तात्पुरती डागडुजी पावसात उखडल्याने पेठांमध्ये वाहतूक कोंडी तसेच खड्ड्यांचा सामना करावा लागला. पावसाळा संपताच प्रशासनाने साडेतीनशे कोटी रुपयांच्या निविदा काढत रस्ते दुरूस्ती सुरू केली. पावसाळ्यापूर्वी आणखी 100 कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यापूर्वी पथ विभागाने महावितरण, ड्रेनेज, पाणीपुरवठा विभागाला रस्ता दुरूस्त करण्याची माहिती देऊन “काही काम असेल तर आधीच करून घ्या. नंतर पाच वर्षे खोदाई करता येणार नाही,’ असे स्पष्ट कळविले. त्यानंतरही अनेक रस्त्यांवर पाणीपुरवठा तसेच ड्रेनेज विभागाने खोदाई केली आहे.
पथ विभागाचा “दिव्याखाली अंधार’
मोबाइल कंपनीला रस्ते खोदाइसाठी पथ विभागाच परवानगी देतो. त्यामुळे कोणती कंपनी कोणत्या रस्त्यावर खोदाई करणार आहे, याची माहिती या विभागाला असते. अशा स्थितीत पाच ते सहा दिवसांपूर्वी नव्याने केलेला रस्ता मोबाइल कंपनीने खोदलाच कसा, असा प्रश्न आहे. खोदाईचे काम सुरू करताना आधी पथ विभागास माहिती दिली जाते. मग, महापालिकेला सुट्टी असल्याच्या दिवशीच भरदिवसा खोदाई कशी करण्यात आली, असा प्रश्न आहे. रस्ते तयार करणाराही पथ विभागच आणि खोदाईला परवानगी देणाराही पथ विभाग, असल्याने “दिव्याखाली अंधार’ असल्याची स्थिती आहे.