पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यातर्फे खासगी विद्यापीठे व खासगी महाविद्यालयातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण आयुक्तालयासमोर निदर्शने करण्यात आली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज खासगी विद्यापीठ, खासगी महाविद्यालये व व्होकेशनल इन्स्टिट्यूट यांनी अजून भरून घेतलेले नाहीत. ७ जुलै २०२३ चा खासगी विद्यापीठांचा शासन निर्णय असतानादेखील सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण संचालनालयाने खासगी विद्यापीठे, खासगी महाविद्यालय, व्होकेशनल इन्स्टिट्यूट यांना अजून आदेश दिलेले नाहीत. शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेतलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अभावी भविष्य अधांतरी आहे. शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने निदर्शने करीत समाज कल्याण आयुक्तालयात निवेदन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव ॲड. सुमेध गायकवाड, सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अमोल कुंभार, संकेत खाडे, ॲड. अशोक माने, विशाल घोडके, अभिषेक शेवाळे, गणेश मसुरकर, ऋषिकेश मुगळे, बी.आर.गायकवाड, संकेत वाघ उपस्थित होते.