प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – पुणे – नाशिक रेल्वेची जुनीच अलाइन्मेट कायम ठेवावी, अशी मागणी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. खोडद (जुन्नर) परिसरातील जीएमआरटी मुळे पुणे – नाशिक रेल्वेचा मार्ग बदलण्याचा घाट घातला जात आहे. त्यावर बोलताना जगभरात १५ देशात रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पाच्या परिसरातून रेल्वे जात आहेत. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून हा प्रकल्प जुन्याच मार्गाने करता येईल असे खासदार कोल्हे यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पांची माहिती घेऊन आपण निर्णय घेऊ असे सांगितले.खासदार डॉ. कोल्हे यांनी पुरवणी प्रश्नात जुन्नर, आंबेगाव तालुके निर्यातक्षम कृषी उत्पादन घेणारे तालुके आहेत. त्यामुळे पुणे – नाशिक रेल्वे मार्गामुळे या भागाचा आर्थिक विकास होऊ शकतो. जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर व आंबेगाव तालुक्यात औद्योगिक विकास होऊ शकत नाही. दोन्ही तालुके भारतातच असून त्यांना विकासाचा हक्क नाही का? असा प्रश्न विचारला. जुन्नर आंबेगाव दोन तालुक्यातील विकासातील कमतरता, त्रुटी कशाप्रकारे दूर करणार असा प्रतिप्रश्न विचारला. यावर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी गती शक्ती योजनेंतर्गत दोन्ही तालुक्यांना नव्या अलाईन्मेटला जोडण्याचा विचार करता येईल, असे सांगितले.तळेगाव ते उरळीकांचन नवीन रेल्वे लाइनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर सर्वांशी चर्चा करून पर्यायी मार्ग काढता येईल, अशी सकारात्मक भूमिका केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली असल्याचे डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.