प्रभात वृत्तसेवा मंचर – पुणे–नाशिक महामार्गालगतच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर व नाशिक परिसरातील नागरिकांनी जुन्या ठरावीक मार्गानेच पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प व्हावा, अशी ठाम मागणी केली आहे. या संदर्भात सर्व आमदार व खासदारांनी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून एकत्रितपणे, संघटित लढा उभारण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांचे मत आहे. रेल्वेमार्ग बदलल्यास प्रवास, व्यापार, उद्योग, कृषी उत्पन्न वाहतूक, पर्यटन यावर मोठा परिणाम होणार असल्याने नागरिकांनी आंदोलनाची चेतावणी दिली आहे. भीमाशंकर, अष्टविनायक, दुर्गम भागातील गावांना या रेल्वेमुळे मोठा लाभ मिळणार असल्याने जुन्या मार्गालाच प्राधान्य दिले पाहिजे, असा आग्रह व्यक्त केला जात आहे. स्थानिक नेतृत्वाने एकवटून केंद्र व राज्य सरकारकडे ठोस पाठपुरावा करावा, नागरिकांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवावे आणि प्रकल्प जुन्या मार्गावरच व्हावा.यासाठी संयुक्त समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “आमदार–खासदारांनी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आल्याशिवाय जुन्या मार्गावरील रेल्वे शक्य नाही. या प्रकल्पामुळे आमच्या भागाचा विकास वेगाने होईल, म्हणून लोकप्रतिनिधींनी ठाम भूमिका घ्यावी. -रमेश येवले, शिवसेना नेते, आंबेगाव तालुका. “रेल्वेमार्ग बदलल्यास हजारो शेतकरी, व्यापारी, विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. आमचा आवाज सरकारपर्यंत नेण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य आणि खासदारांनी एकत्रित लढा अत्यावश्यक आहे.” – भरत भोर, उद्योजक भोरवाडी-अवसरी खुर्द. “नवीन मार्गाचा आग्रह ठेवणाऱ्यांनी आमच्या भागाची परिस्थिती समजून घ्यावी. जुना मार्ग हा लोकहिताचा आहे.” – प्रशांत अभंग,उद्योजक अवसरी खुर्द.