इंद्रायणीनगर (योगेश गाडगे) – पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते चाकण दरम्यान दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून येत आहे. नाशिक फाटा ते चाकण या परिसरात नागरिक, व्यावसायिक राजरोसपणे कचरारूटाकत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला डम्पिंग यार्डचे स्वरूप आले आहे. तसेच व्यावसायिकांनी महामार्गावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे महामार्ग अरुंद बनत असून अपघातास ही दुकाने कारणीभूत ठरत आहेत. अशा दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. स्मार्ट सिटीतील कचरा महामार्गावर टाकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई महापालिका प्रशासन अथवा स्थानिक प्रशासन करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी माती, खडी साचली आहे. त्यामुळे वेगाने येणाऱ्या दुचाकींना अपघात घडत आहे. त्यामुळे महामार्गाची देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महामार्गाच्या रस्त्याच्या कडेला टाकलेला कचऱ्याचे ढीग पाहून महामार्ग कचरा डेपो बनला असल्याचे वास्तविक चित्र आहे. पुणे-नाशिक महामार्गावर कचरा टाकला जात असल्याने भोसरी, मोशी, चिंबळी, चाकण या शहरांचे व गावाच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. राडारोडा, दुर्गंधीयुक्त कचरा, विक्रेत्यांचा शिल्लक राहिलेला टाकाऊ माल महामार्गाच्या कडेला टाकला जातो. भाजी, फळ विक्रेते, सडलेल्या भाज्या व फळे रस्त्याचा कडेला टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच अधूनमधून कचऱ्याचे ढीग पेटवून दिले जात आहेत. त्याचबरोबर प्लॅस्टिकचे कागद जळत असल्याने मोठ्या प्रमाणत वायू प्रदूषण होत आहे. महामार्गा शेजारी टाकलेला कचरा उचलायचा कोणी हा प्रश्न नागरिकांना पडत आहे. कचरा टाकणाऱ्यांवर वेळीच कारवाई होत नसल्याने पुणे-नाशिक महामार्गाचा कचरा डेपो झाला आहे. मात्र, बऱ्याच वेळा हा कचरा उचलून न नेता त्याच ठिकाणी डम्प केला जातो. महामार्गावर व्यावसायिकांकडून अतिक्रमण महामार्गाच्या समस्येत भर पडते ती महामार्गालगत थाटलेली दुकाने व रिक्षा थांब्यांची. नाशिक फाट्यापासून ते चाकण पर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी फळ विक्रेते, खेळणी विक्रेते, नीरा विक्री केंद्रे, हेल्मेट, चष्मे विक्री दुकाने अनधिकृतपणे थाटलेली आहेत. महामार्गावरून धावणाऱ्या वाहनधारकांना आपले ग्राहक बनविण्यासाठी काही व्यावसायिक ध्वनिप्रेक्षकावरून मोठ्या आवाजात विक्रीच्या मालाची जाहिरात करीत असतात. यामुळे ध्वनी प्रदूषण तर होतेच परंतु वाहनचालकाचे लक्ष विचलित होत आहे. शिवाय खरेदीसाठी थांबलेल्या वाहनांची गर्दी महामार्गाच्या कडेला होत असल्यामुळे महामार्गाच्या मार्गात अडसर निर्माण होत आहे. रिक्षा थांब्यांमुळे वाहतूक कोंडी महामार्गावर भोसरी, चाकण, औद्योगिक परिसर तसेच तळेगाव मार्गे जुना मुंबई महामार्ग, संगमनेर, नगर शहराला जोडणारा हा नाशिक महामार्ग आहे. या मार्गावर कायम अवजड वाहतूक व प्रवासी वाहतूक गजबजलेली असते. औद्योगिक परिसरात जाणाऱ्या कामगारांची संख्या लक्षणीय असल्याने या महामार्गावर प्रवासी रिक्षा सर्रास धावत असतात. मात्र या रिक्षांचे थांबे महामार्गालगत असल्याने सिग्नल, चौकात प्रवाशांची वाट पाहत रिक्षाचालक उभा असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाची बघ्याची भूमिका अशा असंख्य समस्यांनी ग्रासलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस ठाणे व भोसरी वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष व महाराष्ट्र राज्य मार्ग व रस्ते विकास महामंडळाचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहेत. परंतु प्रशासनाने याकडे उघडपणे डोळेझाक करत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारवाई कोणावर करायची? महामार्गाच्या कडेला कचरा टाकणाऱ्या वाहनांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न करदात्या नागरिकांना पडत आहे. रात्रीच्या वेळी वाहने येऊन गपचीप कचरा टाकून जातात. त्यामुळे कारवाई तर कोणावर करायची असा प्रश्न महापलिकेच्या संबंधित विभागास पडला आहे. प्रशासनाने या समस्यांककडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा महामार्गावरील सेवा रस्त्याच्या कडेने कचरा डेपो बनतील. पादचाऱ्यांची होतेय गैरसोय मोशी परिसरातील गोडाऊन चौक, भारतमाता चौक, चिंबळी फाटा, कुरुळी फाटा, आळंदी फाटा, चाकण परिसरातील तळेगाव चौक, आंबेठाण चौक ही नाशिक महामार्गावरील प्रमुख ठिकाणे आहेत. यामधील काही भागात सेवा रस्ता नसल्याने पादचारी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बहुतांश वेळा महामार्गावरूनच ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे या भागात सातत्याने लहान मोठे अपघात घडत आहेत.