पुणे – सुमारे ७०० वर्षांचा इतिहास असलेल्या सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिर जीर्णोद्धाराच्या दशकपूर्तीनिमित्त प्रभाग क्र. २४ ड मधील नागरिकांनी गणेश बिडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रयत्नांतून या मंदिराला नवी झळाळी प्राप्त झाली. महापालिकेच्या निधीतून जीर्णोद्धार करण्यात आलेले राज्यातील हे पहिलेच मंदिर ठरले होते. जुन्या पुण्याची धार्मिक ओळख असलेल्या सोमवार पेठेतील नागेश्वर महादेव मंदिरातील सभामंडप कललेला होता, दगडी चिरे ढासळले होते, काही ढासळण्याच्या बेतात होते. जुने दगडी बांधकाम, त्यावरचे कोरीव काम, लाकडी सभामंडप, महिरपी, कोरीव शिल्पे हे सगळे जसेच्या तसे उभे करणे आव्हानात्मक होते. याबाबत बिडकर म्हणाले, मंदिर जुने असल्याने भारतीय पुरातत्व खात्याच्या वारसा स्थळांच्या यादीत होते. जीर्णोद्धारासाठी पुरातत्व खात्याची परवानगी मिळविण्यासाठी सात वर्षांचा अवधी लागला. मात्र, आम्ही धीर सोडला नाही. परवानगीनंतर जुनेजाणते कारागीर आणि नवे तंत्रज्ञान यातून मंदिराचा जीर्णोद्धार साध्य केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे आम्ही नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करू शकलो. त्यासोबतच मेट्रो, नदीसुधार, चोवीस तास पाणीपुरवठा यांसारखे प्रकल्पही यशस्वीरीत्या राबवू शकलो. येत्या महापालिका निवडणुकीत जनतेने पुन्हा भाजपाकडे एकहाती सत्ता दिल्यास पुण्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करण्याचे प्रयत्न करू, असेही बिडकर यांनी स्पष्ट केले.