पुणे -पावसाळा संपताच रस्ते दुरुस्तीला वेग देण्याची घोषणा करणाऱ्या महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीला “ब्रेक’ लागला आहे. महापालिकेचा येरवडा येथील खडी आणि डांबर मिश्रीकरणाचा हॉटमिक्स प्लांट गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. तसेच आणखी आठवडाभर तो सुरू होण्याची शक्यता नाही. ऐन जी-20 परिषदेच्या तोंडावर महापालिका आयुक्तांनी शहरातील रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले असतानाच हा प्रकल्प बंद पडला असल्याने रस्ते दुरुस्तीला “ब्रेक’ लागला आहे. दरम्यान, हा प्रकल्प 9 ते 10 वर्षे जुना असून, त्याची वयोमर्यादा संपलेली आहे. त्यामुळे हा प्रकल्प वारंवार बंद पडत असून, रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेला खासगी ठेकेदारांवर अबलंबून राहावे लागत आहे. येरवडा येथे असलेल्या या प्रकल्पात महापालिका दिवसाला साडेपाचशे टन डांबर खडीचे मिश्रण तयार करते. हे मिश्रण क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच मुख्य खात्यातून प्रमुख रस्त्यांच्या तात्पुरत्या डागडुजीसाठी वापरले जाते. यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिका आयुक्तांनी सर्व अंतर्गत रस्त्यांसह, मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार कामही सुरू करण्यात आले होते. मात्र हा प्रकल्प वारंवार बंद पडत असल्याने तसेच गेल्या काही दिवसांपासून तो पुन्हा बंद पडला असून, त्याच्या दुरुस्तीसाठी आणखी काही कालावधी जाणार असल्याने महापालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे. ठेकेदारांवर मदार महापालिकेचा हॉटमिक्स प्रकल्प बंद पडल्याने खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकेस ठेकेदारांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, त्यांना काम द्यायचे झाल्यास निविदा काढणे आणि वर्क ऑर्डर देणे यात मोठा वेळ जातो. तसेच अनेकदा ठेकेदारांकडून कोल्डमिक्स वापरून हे काम केले जाते. त्यामुळे रस्ते पुन्हा उखडतात. त्यामुळे महापालिका हॉटमिक्सद्वारे रस्ते दुरुस्तीस प्राधान्य देते. त्यामुळे पालिकेचा प्रकल्प तातडीने सुरू होणे गरजेचे आहे.