पुणे – शहरातील मध्यवर्ती भाग तसेच उपनगरांत असलेल्या मोठ्या नाट्यगृहांचे पार्किंग पुन्हा निविदा काढून चालविण्यास देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या 5 नाट्यगृहांचे पार्किंग चालविण्यास दिले जाणार असून, त्यातून सुमारे 60 ते 65 लाखांचा महसूल प्रशासनास अपेक्षित आहे. करोना काळानंतर ही वाहनतळे महापालिकेच्याच ताब्यात असून ते चालविण्यासाठी पालिकेचेच कर्मचारी नेमलेले आहेत. दरम्यान, या निविदा प्रशासनाने अंतिम केल्या असून लवकरच त्या जाहीर केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या महत्त्वाच्या नाट्यगृहांमध्ये बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा रंगमंच, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक, पं. भीमसेन जोशी कलामंदिर, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह यांचा समावेश आहे. येथे प्रेक्षक आणि रसिकांची सदैव गर्दी असते. महापालिकेकडून येथे पार्किंग व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. मात्र, यातून काही उत्पन्न मिळत नाही. उलट खर्चच करावा लागतो. काही ठेकेदारांना भाडे तत्वावर पार्किंग चालवण्यास देण्यात आले होते. मात्र, त्यांची मक्तेदारी होऊ लागली. त्यामुळे तक्रारी येऊ लागल्याने निविदा संपल्यानंतर तसेच करोना काळात ठेकेदारांनी काम बंद केले होते. असा मिळणार महसूल प्रशासनाच्या प्रस्तावानुसार, 5 नाट्यगृहांचे “पार्किंग’ भाडे तत्वावर दिली जाणार आहेत. कोथरूडच्या नाट्यगृहाचे काम सुरू असल्याने त्याची प्रक्रिया नंतर करण्यात येणार आहे. मात्र, बाकी ठिकाणची टेंडर प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे. यामध्ये गणेश कला क्रीडा रंगमंच आणि बालगंधर्वच्या पार्किंग मधून महापालिकेला वार्षिक प्रत्येकी 18 लाख 46 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. अण्णा भाऊ साठे स्मारकामधून 14 लाख, महात्मा फुले सांस्कृतिक भवन मधून जवळपास 8 लाख आणि भीमसेन जोशी कलामंदिर मधून 90 हजार, असे 50 ते 60 लाखांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.