Pune: लाडक्या भावांसाठी पालिकेने उघडले दार

पुणे – राज्यातील बारावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (लाडका भाऊ योजना) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील युवकांना महापालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सुमारे ६५० जागांवर सहा महिने हे काम करण्याची संधी मिळणार असून विद्या वेतनही दिले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी या जागांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या जागांमध्ये सर्वाधिक जागा अभियांत्रिकी तसेच आयटीआय संवर्गातील असून बारावी झालेल्या युवांना ६ हजार रूपये, आयटीआय किंवा पदविका झालेल्या युवांना ८ हजार रूपये तर पदवीधर अथवा पदव्यूत्तर शिक्षण झालेल्या युवकांना दहा हजार रूपयांचे विद्या वेतन दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली.
येथे मिळणार कामाची संधी…
महापालिकेच्या वाहन विभागात मॅकेनिक, सुतार, पेंटर शीट मेटल वर्क, मशीन टूल दुरूस्तीसह, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य), ट्रॅफिक वाॅर्डन, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्यान विभागात माळी, हाॅर्टीक्लचर मिस्त्री, क्षेत्रीय कार्यालयाकडील स्वच्छता विषयक कामे, अनुरेखक, आरेखक, लेखनिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ट अभियंता, आपत्ती व्यस्थापन विभाग, पर्यावरण विभागात काम करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.


