Pune : पालिका कर्मचारी प्राप्तीकरच्या जाळयात

पुणे : विहित मुदतीत आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याकडे दूर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना प्राप्तीकर विभागाने दंडाच्या नोटीसा दिल्या आहेत. ही थकबाकीची रक्कम तब्बल ४० ते ५० कोटी रूपयांची असून, महापालिकेने ती वेतनातून वसूल करावी असे पत्र प्राप्तीकर विभागाने महापालिकेस दिले आहे. दुसरीकडे ही रक्कम वसूल करू नये व महापालिका प्रशासनाने पगार अडवू नयेत, अशी मागणी पीएमसी एम्प्लॉईज युनियनने अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे केली आहे.
महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने आणि महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराच्या चुकीमुळे हा भूर्दंड लागला असल्याचा आरोप महापालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकरणी हात वर केले असून, प्राप्तीकर विभागाकडून ही वसुली सुरु आहे. ज्यांनी आधार व पॅक कार्ड लिंक केलेले नाही, त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जात असल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
प्राप्तीकर विभागाकडून पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले होते. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडूनही याबाबत आदेश काढण्यात आले होते. मात्र, महापालिका आपल्या वेतनातून कर वजावट करत असल्याने पालिकेकडूनच बॅंक खाते आणि आधारखाते लिंक केले असेल, असा समज करत अनेक कर्मचाऱ्यांनी याकडे दूर्लक्ष केले. त्यातच महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने अनेक चतुर्थश्रेणी मधील कर्मचाऱ्यांनाही प्राप्तीकर लागू झाला. पण, अनेक कर्मचाऱ्यांना ही माहितीच नव्हती. त्यामुळे त्यांनी पॅनकार्ड आधार कार्ड लिंक केले नाही. त्यांचे वेतनही कर वजावट न करताच काढण्यात आले. प्राप्तीकर विभागाच्या तपासणीत ही बाब समोर येताच त्यांनी तत्काळ महापालिकेस ही माहिती कळविली, तसेच कर्मचाऱ्यांना कर भरण्याच्या सूचना देण्यास सांगण्यात आले.
प्राप्तीकर विभागाने दिलेल्या पत्रानुसार ही थकबाकी रक्कम पाच हजारांपासून ते दिड लाखांपर्यंत आहे. ही रक्कम दोन टप्प्यात वसूल केली जाणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपले दोन महिन्यांचे वेतन प्राप्तीकरापोटी भरावे लागणार आहे. त्यामुळे वित्त व लेखा विभागाने अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन अडविले आहे.
ही थकबाकी २०१४ पासूनची दाखविण्यात आली आहे. मग इतक्या वर्षात वसुलीबाबत कोणताही आदेश का देण्यात आलेला नाही? याबाबत पूर्वसूचना दिली असती तर वेळोवेळी प्राप्तीकर भरून ही रक्कम परत मिळवता आली असती. पण आता कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून सेवकांना विनाकारण दंड भरण्यास सांगितले जात आहे.
– बजरंग पोखरकर (पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष )
कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आज भेटले आहे, त्यांच्या तक्रारीनुसार तपासणी करण्यास सांगितले आहे. तसेच नोटीसही मागवली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, त्यांचे वेतन अडवू नये असे लेखा व वित्त विभागाला सांगितले आहे.
– पृथ्वीराज बी.पी (अतिरिक्त आयुक्त)
.




