Pune : पावसाळ्यासाठी महापालिकेचे शीघ्र कृती दल सज्ज; नागरिकांच्या संरक्षणासाठी स्थापना

पुणे : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मलनिःसारण विभाग, पथ विभाग आणि क्षेत्रीय कार्यालय यांच्यात समन्वय साधून कामे करणे आवश्यक आहे. यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयनिहाय सहायक महापालिका आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली शीघ्र कृती दल (क्विक रिस्पॉन्स टीम) ची स्थापना करण्यात आली. गेल्या काही वर्षांत शहरात पावसाळ्यात एखाद्या ठराविक भागात अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा नसल्यास नागरिकांना वित्त तसेच अनेकदा जीवितहानीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन हे दल स्थापन करण्यात आले आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील अस्तित्वातील नाले, पावसाळी लाईन व मलवाहिन्यांची साफसफाई मलनिःसारण विभागामार्फत ७ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली आहे. सद्यःस्थितीत नालेसफाई आणि पावसाळी लाईन साफसफाईचे जवळपास ८० टक्के कामकाज पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम ७ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अचानक नाला, पावसाळी लाईन व मलवाहिनी तुंबून उद्भवणाऱ्या ठिकाणी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याने ही पथके महत्त्वाची ठरणार आहेत.
या पथकामध्ये मलनिःसारण विभाग, पथ विभाग, मोटार वाहन विभाग, बांधकाम विकास विभाग व क्षेत्रीय कार्यालयाकडील उप अभियंत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी आपापसात योग्य तो समन्वय साधून पावसाळा कालावधीमध्ये रस्त्यावर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. तसेच, रस्त्यावर पाणी साचल्यास त्वरित योग्य ती उपाययोजना करावयाची आहे. त्यासाठी या पथकाकडे जेटींग मशिन, जेटींग कम सक्शन मशिन, ग्रॅब मशिन, चॅम्पिअन मशिन, सक्शन कम रिसायकलिंग मशिन, जेसीबी असणार असून दिवसपाळीमध्ये व रात्रपाळीमध्ये हे पथक कार्यरत असणार आहे.
पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर राहणार लक्ष
मागील वर्षी शहरात २०१ ठिकाणी पाणी साचले होते. त्यानंतर मागील वर्षभरात महापालिकेकडून ११७ ठिकाणी कामे करण्यात आली आहेत. तर जवळपास ६२ ठिकाणी अद्यापही कामे सुरू आहेत. तर २२ ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने या ठिकाणी पाणी साचण्याची भीती आहे. याशिवाय, शहरात मागील आठवड्यात झालेल्या पूर्वमोसमी पावसाने नव्याने पाणी साठणारी २९ ठिकाणे समोर आली आहेत. त्यामुळे या पथकाकडे मागील वर्षांच्या ठिकाणांसह सुमारे २३० ठिकाणांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय यादी देण्यात आली असून, त्यावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





