पुणे -महापालिकेने प्रशासकीय कामाचा ताण कमी करण्यासाठी नुकतीच 400 पदे भरली असताना पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आणखी 300 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेत 34 गावांचा समावेश झाल्याने अभियंत्यांसह अन्य काही सर्वंगातील पदांची संख्या वाढवावी लागणार आहे. यासंदर्भात शासनाकडे लवकरच पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच लवकरच अग्निशमन दल, डॉक्टर, आरोग्य निरीक्षक, इलेक्ट्रीकल इंजिनिअरसह अन्य काही संर्वगातील साधारण 300 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले की, महापालिकेमध्ये 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तेथील ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येईल. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे; परंतु ग्रामपंचायतींमध्ये अभियंते व अन्य तत्सम पदे नसल्याने महापालिकेच्या यंत्रणेवर ताण पडत आहे. परिणामी या गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या सेवा सुविधा देण्यात अडचणी येत असून, प्रशासकीय कामकाजही सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत कामासाठी पदे निर्माण होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सर्व विभागांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, ही नवीन पदे भरताना अंदाजपत्रकाच्या 35 टक्क्यांपेक्षा अधिक खर्च हा वेतनावर होणार नाही, याची दक्षता घेऊनच संवर्गात पदांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, त्यानुसार शासनाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.