पुणे : महापालिकेकडून जी 20 परिषदेसाठी सेनापती बापट रस्त्यावर रत्ना हॉस्पीटल समोर तयार केलेल्या “रेज्ड क्रॉसिंग’ मधील दुभाजकाचा अडथळा मंगळवारी रात्रीत दूर केला असून नागरिकांना आता हा पादचारी मार्ग सुरक्षितपणे वापरता येणार आहे. रत्याच्या दोन्ही बाजूने “रेज्ड क्रॉसिंग’ तयार केल्यानंतर सबंधित ठेकेदाराने दुभाजक तसेच ठेवले होते तर ज्या भागात दुभाजक काढले तिथं “रेज्ड क्रॉसिंग’ न करता शेजारच्या जागेत केले होते. त्यामुळे या “रेज्ड क्रॉसिंग’ चा वापर करता येणार नव्हताच, मात्र अशा चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे पालिकेच्या अभियंत्याच्या कामकाज पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाला होता. या चुकीच्या कामाचा कारभार दैनिक प्रभात ने ऑनलाईन वृत्ताद्वारे उघडकीस आणला होता. त्याची दखल घेत महापालिकेने रातोरात अवघ्या काही तासात या “रेज्ड क्रॉसिंग’ ची चूक सुधारली असून तो नागरिकांना चालण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे
काय होता ‘रेज्ड क्रॉसिंग’ गोंधळ
सर्वसाधारणपणे मुख्य चौकात आणि वर्दळीच्या चौकांमध्ये मुख्य रस्त्यावर दोन चौकात 250 मीटर पर्यंतच्या अंतरात हे क्रॉसिंग बसविले जातात. विशेशत: शाळा, दवाखाने, अथवा बाजारपेठेचा रस्ता असलेल्या भागात हे क्रॉसिंग बसवितात. जी20 परिषदेसाठी शहरातील रस्त्याचे सुशोभिकरण केले जात असल्याने महापालिकेने सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पीटलच्या समोर हे क्रॉसिंग बसविले आहे. चौकात असलेले इतर क्रॉसिंग हे रस्त्याच्या समपातळीत असतात तसेच त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे असतात. तर रेज्ड क्रॉसिंग रस्ताच्या दोन्ही बाजूंना जोडणारे तसेच पदपथाच्या उंची एवढे असतात. तसेच सुमारे अडीच मीटर रूंद असतात. त्यामुळे ते स्पीड ब्रेकरसारखे इतराचे तसेच मध्यभागी सहज पादचाऱ्यांना चालता येईल असे असतात, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पदपथांना हे क्रॉसिंग असल्याने ते सरळ असते त्यामुळे, रस्ता दुभाजकही काढणे आवश्यक असते. मात्र, रत्ना हॉस्पीटल समोर हा क्रॉसिंग तयार करून त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून तो पूर्ण तयार करून झालेला असून दुभाजक न काढताच तो तसाच सोडून देण्यात आला आहे. त्यामुळे, नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही, त्यामुळे नागरिक या ठिकाणी असलेल्या जुन्या क्रॉसिंगसाठी फोडलेल्या दुभाजकाचा वापर करत असून या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला होता.