Pune : ठेवींच्या व्याजावर महापालिका मालमाल

पुणे : महापालिकेकडून दरवर्षी शिल्लक राहिलेले पैसे प्रत्येक सहा महिन्यांसाठी बॅंकेत ठेवले जात आहेत. या ठेवी सुमारे चार हजार कोटींच्या घरात गेल्या असून त्यातून महापालिकेस वर्षाला तब्बल २०० कोटींचे व्याज मिळत आहे.
करोनाच्या साथीत सलग दोन वर्षे महापालिकेच्या खर्चावर बंधने घालत केवळ आरोग्य सेवांसाठी खर्च करण्यात आल्याने महापालिकेच्या ठेवी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मिळणारी व्याजाची रक्कमही वाढली असल्याचे महापालिकेच्या अंदाजपत्रकातून समोर आले आहे. या, शिवाय, शासनाकडूनही आलेला निधी अनेक वेळा महापालिका लगेच खर्च करीत नसल्याने हा निधीही बॅंकेत ठेवला जात असल्याने त्यावरही महापालिकेस घसघशीत व्याज मिळत आहे.
२०२४- २५ या आर्थिक वर्षात महापालिकेस २०१ कोटी ६३ लाखांचे व्याज मिळाले आहे. तर पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात ( २०२५-२६) मध्ये व्याजातून २३० कोटींचे व्याजाचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे.
करोनाच्या काळात वाढल्या ठेवी
करोना काळात मार्च २०२० पासून पुढील दोन वर्षे शहरातील विकासकामे ठप्प होती. पालिकेच्या वित्तीय खर्चावर मर्यादा आणण्यासाठी शासनाकडून आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय समिती नेमण्यात आली. त्यामुळे केवळ आरोग्य विभागास खर्चाची मुभा होती तर इतर विभागांना केवळ ३३ टक्केच खर्च करण्याचे बंधन होते. या काळात पालिकेचे मिळकतकर, शासनाचे अनुदान, बांधकाम विकसन शुल्क यांचे उत्पन्न सुरू असल्याने महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक होता. हा निधी पालिकेकडून बॅंकेत ठेवींमध्ये ठेवण्यात आला. त्यामुळे २०२०-२१ नंतर पालिकेच्या ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झाली. २०२०-२१ मधे महापालिकेस ठेवींवरील् व्याजातून ८० कोटी ६१ लाखांचे उत्पन्न मिळत होते हे उत्पन्न २०२४-२५ पर्यंत तब्बल २०१ कोटी ६३ लाखांवर गेले आहे.
वर्ष / ठेवींवर मिळालेले व्याज
२०२०-२१ : ८० कोटी ६१ लाख
२०२१-२२ : ११९ कोटी १५ लाख
२०२३-२४ : १५९ कोटी ६० लाख
२०२४-२५ : २०१ कोटी ६३ लाख
२०२५-२६ : २३० कोटी ( अंदाजित)





