पुणे –महापालिकेची मान्यता न घेता जाहिरातींचे होर्डिंग्ज उभारण्यात आलेल्या 29 मिळकतींवर प्रशासनाने सुमारे 14 लाख 50 हजार रुपयांचा बोजा चढविला आहे. तर अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, झेंडे इ. लावणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी 53 ठिकाणी पोलीस स्टेशनकडे फिर्याद दिलेली आहे. तसेच 5 गुन्हे दाखल केल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
महापालिकेने मागील 10 दिवसांत केलेल्या विशेष कारवाईत 18 हजार 23 अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर्स हटवले आहे. अनधिकृत होर्डिंग्ज तसेच फुकट जाहिरातबाजी रोखण्यासाठी आयुक्तांनी दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अनधिकृत होर्डिंग्ज लावल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो. असा गेल्या वर्षभरात सुमारे 23 लाख 12 हजार 500 रुपयांचा दंड आकारलेला आहे. हा दंड वेळेत न भरल्यास संबंधित होर्डिंग असलेल्या जागामालकाच्या मिळकतीवर पालिका बोजा चढविते. त्यानुसार आता पर्यंत दीड लाखांचा दंड वसूल झाला आहे. उर्वरित 29 जागामालकांच्या मिळकतींवर बोजा चढवला आहे. तर बोर्ड, बॅनर्स तसेच पोस्टर लावणाऱ्यांकडून पालिकेने 7 लाख 12 हजार रुपये वसूल केले आहेत.