विकसनाचे अधिकार पालिका स्वत:कडेच ठेवणार
पुणे – महापालिकेने स्वमालकीच्या जागा (ऍमेनिटी स्पेस) विकायला काढल्या आहेत. मात्र, त्या जागांचे विकसन महापालिकेच्या मर्जीनेच करावे लागणार आहे. मालक जरी महापालिका नसली तरी त्या जागांचा वापर कोणत्या कारणासाठी करायचा याचे अधिकार महापालिका स्वत:कडे ठेवणार आहे.
महापालिकेकडे उत्पन्न वाढीचे स्रोत कमी आहेत. ते वाढवण्यासाठी महापालिकेने आता स्वत:च्या मालकीच्या जागा विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने “लिस्टींग’ केलेल्या 161 जागांपैकी 117 जागा विकण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासन तयार करत आहे. याविषयीचे धोरण ठरवण्यासाठी हा प्रस्ताव शहर अभियंता कार्यालयाकडे पाठवला असून, यावर महापालिकेच्या विधी विभागाचाही अभिप्राय घेण्यात येणार आहे.
याविषयीचे धोरण निश्चित झाल्यानंतर आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या जागांची लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार असून या दराची बोली ही सव्वाशे टक्क्याने जास्त ठेवण्यात येणार आहे.
शहरात उपनगरांसह सुमारे 21 भागांमध्ये ही जागा असून विक्रीला काढलेल्या जागांचे मिळून एकूण क्षेत्रफळ सुमारे 34 एकर आहे.
उपनगरांमधील जागांची संख्या…
बालेवाडी – 7, आंबेगाव -5, बाणेर -14, बावधन खुर्द – 1, धानोरी – 3, धायरी – 5, घोरपडी – 1, हडपसर – 5, हिंगणे खुर्द – 1, कात्रज – 2, खराडी – 19, कोंढवा बुद्रुक – 9, कोंढवा खुर्द -8, कोथरूड – 4, महंमदवाडी – 4, पाषाण – 5, शिवाजीनगर – 1, उंड्री – 1, वडगाव बुद्रुक – 9, वडगाव खुर्द -2, वडगावशेरी – 3, वारजे – 3, येवलेवाडी – 4
याध्ये प्ले ग्राऊंड, शाळा, जिम, स्टेडियम, बाग, हायस्कूल, प्राथमिक शाळा, हॉस्पिटल, डिस्पेन्सरी, फायर ब्रिगेड स्टेशन, पोलीस स्टेशन, इलेक्ट्रिक सब स्टेशन, पार्किंग वगैरेंसाठीच या जागा विकसकाला वापरता येणार आहेत.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका