पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी दिल्याची बातमी समोर आली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना प्रभाग क्रमांक २३ मधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. या दोघींना तुरुंगातूनच प्रचार करावा लागणार आहे. विशेष न्यायालयाने २६ डिसेंबरला बंडू आंदेकर, सोनाली आणि लक्ष्मी यांना सशर्त परवानगी दिल्यानंतर या दोघींनी २७ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अजित पवार गटाने एबी फॉर्म देऊन या उमेदवारीला अधिकृत मान्यता दिली आहे. मात्र, बंडू आंदेकरला मात्र पक्षाकडून तिकीट मिळाले नाही; तो अपक्ष लढत असल्याची माहिती मिळत आहे. नेमकं प्रकरण काय? आंदेकर कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक आणि गुन्हेगारी वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली. त्याचा बदला म्हणून गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची ५ सप्टेंबर २०२४ रोजी गोळीबार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात बंडू आंदेकर, त्याची सून सोनाली (३६), भावजय लक्ष्मी (६०) यांच्यासह १६ जणांवर खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. हे तिघेही येरवडा जेल आणि कोल्हापूर जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. या निर्णयामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करेन असे सांगणाऱ्या अजित पवार यांच्या शब्दांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आयुषच्या आई कल्याणी कोमकर यांनी अजित पवार यांच्याकडे आंदेकर कुटुंबीयांना तिकीट न देण्याची विनंती केली आहे. यापूर्वी गुंड गजानन मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनाही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती, यामुळे पक्षाच्या कायद्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुण्यातील प्रभाग १० बावधनमधून जयश्री मारणे यांनी उमेदवारी जाहीर करत एबी फॉर्म दिले आहे. त्यानुसार जयश्री मारणे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पुण्यातील गुन्हेगारी थांबवा, असे म्हणणाऱ्या अजित पवारांच्या पक्षानेच गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.