PMC Bomb Threat : पुणे महापालिकेला पुन्हा बॉम्बची धमकी; नवीन इमारतीतील कार्यालये रिकामी करण्यास सुरुवात
PMC Bomb Threat : मुंबईनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. नवीन इमारतीतील कार्यालये रिकामी करण्यास सुरुवात; तपासासाठी श्वान पथक दाखल.

PMC Bomb Threat : मुंबईनंतर आता पुणे महापालिकेलाही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. महापालिकेला धमकीचा ई-मेल आल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नवीन इमारतीमधील कार्यालये रिकामी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तपासासाठी श्वान पथकही महापालिकेत दाखल झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कार्यालये बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्यांचे सत्र सुरू आहे. मुंबईतील महापौर कार्यालय, न्यायालय, बँक, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, महालक्ष्मी रेसकोर्स, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा उल्लेख धमकीच्या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. या घटनेनंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
आता मुंबईप्रमाणेच पुणे महापालिकेलाही धमकीचा ई-मेल मिळाल्याने चिंता वाढली आहे. महापालिकेला यापूर्वीही वारंवार अशा प्रकारचे ई-मेल येत असल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या सततच्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणाही वैतागल्या आहेत. सध्या महापालिकेच्या नवीन इमारतीत तपासणी आणि सुरक्षेच्या उपाययोजना सुरू आहेत.





