Pune : महापालिकेची ३४४ खेळाडूंना शिष्यवृत्ती

पुणे : पुणे शहरातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३४४ खेळाडूंना पुणे महापालिकेच्या सुधारित क्रीडा धोरण २०१८ अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
यासाठी महापालिकेला एकूण ८७ लाख २० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या प्रस्तावास नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी क्रीडा शिष्यवृत्ती वितरणाची कार्यवाही क्रीडा विभागामार्फत केली जाणार आहे. यासाठी महापालिकेने खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार एकूण ७४३ अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांची छाननी करून ३४४ खेळाडूंना पात्र ठरवण्यात आले आहे.
यासाठी पात्र आणि अपात्र अर्जदारांची यादी तयार करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती वेगवेगळ्या १० गटांनुसार दिली जाणार असून प्रत्येकी १० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम खेळाडूंना दिली जाणार आहे. हे अनुदान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार आहे.





