पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ब (अराजपत्रित) परीक्षा रविवार, दिनांक २१ डिसेंबरला नियोजित केली आहे. मात्र, याच दिवशी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एमपीएससी परीक्षा सतत पुढे ढकलल्या जातात आणि वेळेवर होत नाहीत. दि. २१ डिसेंबरला नगरपरिषद निकाल आणि त्याच दिवशी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. ही परीक्षा होणार की पुढे जाणार, याबाबत एमपीएससीने तत्काळ स्पष्टता द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. दि. २१ डिसेंबरला सहायक कक्ष अधिकारी- ०३ पदे, राज्य कर निरीक्षक–२७९ पदे, पोलीस उपनिरीक्षक – ३९२ पदे यासाठी पूर्व परीक्षा होत आहे. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार की नाही, याबाबत उमेदवारांचे लक्ष आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे.