पुणे : आंदेकर टोळीवर मोक्का

बंडू आंदेकर, नंदकुमार नाईक ससून रुग्णालयात
पुणे – शहराच्या मध्यभागात दहशत निर्माण करणाऱ्या आंदेकर टोळीवर आता संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (मोक्का अंतर्गत) कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (60, रा. नाना पेठ) आणि नंदकुमार बाबुराव नाईक (72, रा. शुक्रवार पेठ) हे दोघेही उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाले आहेत.
ऋषभ देवदत्त आंदेकर (22, रा. लक्ष्मीनगर, येरवडा सध्या रा. रास्ता पेठ), हितेंद्र विजय यादव (32), दानिश मुशीर शेख (28), योगेश निवृत्ती डोंगरे (28), विक्रम अशोक शितोळे (34), अक्षय दशरथ अकोलकर (28), स्वराज उर्फ शक्ती निलंजय वाडेकर (19, सर्व रा. नाना पेठ), प्रतिक युवराज शिंदे (18, मंगळवार पेठ, जुना बाजार), यश संजय चव्हाण (19, रा. लक्ष्मीनगर, आंबेडकर वसाहत, पर्वती), देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफांडे (21, रा. रामगडवस्ती, विश्रांतवाडी) आणि वैभव नितीन शहापुरकर (19, रा. नानापेठ, धनगरवाडा) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
याबाबत ओंकार गजानन कुडले (वय 21,रा. बांबु आळी, गणेश पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यापारी पेठ असलेल्या गणेश पेठ, नाना पेठ भागात आंदेकर टोळीची दहशत आहे. कुडले आणि आंदेकर टोळीतील काही जणांचे वाद होते. कुडले आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने 21 फेब्रुवारी रोजी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. कुडलेवर बंडू आंदेकरच्या सांगण्यावरून साथीदारांनी वार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी आंदेकरसह गाडी गण्या, सूरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आंदेकरला मध्यरात्री नाना पेठ भागातून अटक करण्यात आली.
पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी मोक्काच्या कारवाईच्या अनुषंगाने प्रस्ताव दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर करत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे आंदेकर टोळीतील सदस्य असून त्याच्यावर देखील गुन्हे दाखल असून ते सक्रिय गुन्हेगार आहेत. वर्चस्वाच्या वादातून व आर्थिक लाभ मिळावण्यापोटी बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून खुनाचा प्रयत्न झाला आहे.
पुणे शहरामध्ये मागील काही महिन्यात टोळी प्रमुख आंदेकर याच्या टोळीतील गुंडांनी समर्थ, बंडगार्डन, कोंढवा, विश्रामबाग व खडक पोलीस ठाण्याच्या परिसरात प्राणघातक हल्ले केले आहे. हल्ल्यामध्ये घातक शस्त्रे व वाहनांचा वापर केला आहे. आंदेकर याने घातक शस्त्रे व वाहने व मनुष्यबळ पुरविणे याचे नियोजन करून आर्थिक पुरवठा केला आहे. त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत. बंडू आंदेकर याने एकाकडून 10 लाख रुपये आणले होते. त्यापैकी पाच लाख रुपये त्याने स्वतःकडे ठेवून उर्वरित पाच लाख रुपये ओंकार कुडले याला ठार मारण्यासाठी दिले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याने गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशातून मु. पो. पंढरपूर जि. सोलापूर येथे मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या व कुंटुंबाच्या नावावर स्थावर मालमत्ता निर्माण केली आहे. त्याने बॅंकेत काही रोकड गुंतवली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.





