पुणे – पोलीस म्हटले, की खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा, असंवेदनशील आणि तंत्रज्ञानाची काही देणे घेणे नसणारा अशीच प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र पोलीस दलात या प्रतिमेची चौकट तोडणारेही अनेक कर्मचारी आहेत. यातील काहींनी तंत्रज्ञानाचा वापर करुन बड्या सायबर गुन्ह्यांची उकलही केली आहे. तर काही दैनंदिन कामकाजाचा भाग असलेला बंदोबस्त, तपास आणि गस्त संभाळून तंत्रज्ञानाच्या साह्याने छोट्या मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा करीत असतात. अशाच एका पोलीस कॉन्सटेबलने तंत्रज्ञानाशी मैत्री करुन दोन महिन्यांत चोरीला गेलेल्या तब्बल 45 मोबाइलचा “ट्रेस’ लावला आहे. आदेश चलवादी असं या पोलीस कॉन्सटेबलचं नाव. ते म्हणतात, मी सहा वर्षे सायबर सेलला काम केले आहे. या कालावधीत कॉसमॉस बॅंक प्रकरण, एटीएम फ्रॉड, टीईटी घोटाळा, कार्ड क्लोनिंग आदी केसेसच्या तपासात भाग घेता आला. यामुळे तांत्रिक ज्ञान मिळालेच तसेच तंत्रज्ञानाची आवडही निर्माण झाली. मी सहा महिन्यांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रुजू झालो. माझे अगोदरचे काम लक्षात घेऊन मला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी इतर जबाबदाऱ्यांबरोबरच “मोबाइल ट्रेसिंग’चे काम सोपवले. मी दोन महिन्यांत चोरीला गेलेले 45 मोबाइल ट्रेस करुन दिले. परराज्यांतून रिकव्हरी पुण्यातून चोरीला गेलेले मोबाइल कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे सापडतात. मोबाइल वापरकर्त्यांना विचारणा केल्यावर ते दोन ते पाच हजारांत मोबाइल विकत घेतल्याचे सांगतात. यानंतर त्यांना मोबाईल चोरीचा असून, त्यासंदर्भात गुन्हा दाखल असल्याची कल्पना देण्यात येते. त्यांना मोबाइल कुरिअरने पोलीस ठाण्यात पाठविण्यास सांगण्यात येते. चोरीचा मोबाइल वापरल्यावर काय कायदेशीर अडचणी निर्माण होतील, याची कल्पना त्यांना दिली जाते. यामुळे ते मोबाइल पाठवून देतात. जे मोबाइल पाठविण्यास नकार देतात, त्यांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यांना दिली जाते. अशी होते मोबाइल चोरी अनेकदा बसथांब्यावरून मोबाइल चोरीस जातात. चोरलेले मोबाइल गुलटेकडी मार्केट यार्ड येथे परराज्यातून येणाऱ्या ट्रकद्वारे त्या त्या राज्यात पाठवले जातात. चोरीचे मोबाइल वापरणाऱ्यांना विचारणा केली असता, ते अनेकदा ट्रक चालक किंवा क्लिनरकडून मोबाइल विकत घेतल्याचे सांगतात. मोबाइल चोरल्यानंतर साधारणत: महिनाभर चोरटा मोबाइल बंद ठेवतो. जेणे करुन त्याचा ट्रेस करणे सोडून दिले असेल. यानंतर त्याची विक्री केली जाते. मात्र आम्ही मोबाइल कंपन्यांना माहिती देऊन मोबाइल ट्रेसिंगवर ठेऊन त्याचा छडा लावतो. या कामी माझे सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक मला मार्गदर्शन करतात, असे चलवादी यांनी सांगितले.