शिवसेना असो वा आघाडी केली पक्षाने ४० जागांची तयारी पुणे : महापालिका निवडणुकीत शिवसेना उध्द्वव बाळसाहेब ठाकरे या पक्षासोबत लढण्याच्या तयारीत असलेली मनसे महाविकास आघाडीतही जाण्यास स्थानिक पातळीवर तयार आहे. त्यासाठी मनसेकडून शिवसेनेसोबत लढल्यास किती जागा असाव्यात आणि आघाडीत सोबत लढल्यास किती जागा असतील याचे समिकरण निश्चित केले आहे. त्यानुसार मनसेने पुण्यात ४० जागांवर लढण्याची तयार केली आहे. या जागा मनसेला अनुकूल असल्याचे पक्षाने घेतलेल्या आढावा बैठकांमधून समोर आले आहे. या जागांमध्ये २०१२ मध्ये जिंकलेल्या जागांचाही समावेश असून या ठिकाणी पुन्हा माजी नगरसेवकांना पक्षाकडून संधी दिली जाणार आहे तर काही जागांवर उमेदवार बदलण्यात येणार आहे. मुंबईच्या आदेशाची प्रतिक्षा पुण्यात शिवसेना शिवसेना उध्द्व बाळसाहेब ठाकरे पक्षासोबत महापालिका लढण्यासाठी या दोन्ही पक्षांची एक औपचारीक बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून जागा वाटपाबाबत तसेच कोणता भाग कोणाला अनुकूल आहे, याबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी या दोन्ही पक्षात दुसरी बैठक होणार होती. मात्र, मुंबईतून युतीबाबत कोणत्याही सूचना न आल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचवेळी दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत समविचारी पक्षांना किमान समान कार्यक्रम मान्य असल्यास महाविकास आघाडीत त्यांना घेण्याचे सूतोवाच काॅग्रेसकडून करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने मनसेलाही दरवाजे खुले ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेला मुंबईतून आदेशाची प्रतिक्षा असून पुढील काही दिवसात मनसेची भूमिका स्पष्ट होणार आहे.