Pune : वीज किती वापरली याची मिनिटागणिक माहिती

पुणे : महावितरणकडून नवीन वीजजोडणीसाठी तसेच सदोष व नादुरुस्त मीटर बदलताना आधुनिक तंत्रज्ञानाचे टाइम ऑफ डे (टीओडी) वीजमीटर मोफत लावण्यात येत आहेत. या “टीओडी’ प्रणालीमुळे अचूक मीटर रीडिंग तसेच वीजवापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाला ग्राहकाला मोबाइलवर माहिती मिळणार आहे. येत्या एप्रिलपासून हे “टीओडी’ मीटर मोफत दिले जाणार आहेत.
हे “टीओडी’ मीटर प्रीपेड नाहीत. तर, सध्याच्या मीटरप्रमाणे पोस्टपेड म्हणजेच वीज वापरानंतर दरमहा बिल या पद्धतीचे आहे. त्यामुळे सध्याच्या बिलिंग प्रणालीमध्ये कोणताही बदल होणार नाहीत, असे महावितरणकडून सांगण्यात आले. कमी वीज वापरणाऱ्यांना कमी दर आणि जास्त वीज वापरणाऱ्या अधिक दरअसे वीजदराचे सूत्र यापुढेही कायम राहणार आहे. एप्रिलपासून घरगुती ग्राहकांना टाइम ऑफ डे (टीओडी) प्रमाणे वीज दर लागू होणार आहे.
महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदरनिश्चिती प्रस्तावात घरगुती ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास सवलत देऊ केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे.
“टीओडी’ मीटरची वैशिष्ट्ये
– वीजवापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाचे अपडेट मोबाइलवर
– अचुक बिलिंग होणार
– मीटर रीडिंग घेते वेळी येणारे दोष दूर होणार
– या मीटरसाठी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड नाही
– डिजिटल मीटरमुळे विजेची नेमकी मागणी किती आहे याचा निश्चित अंदाज
नव्या डिजिटल वीजमीटरमुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक व स्वयंचलित रीडिंग होणार आहे. ते ग्राहकांला मोबाइलवर पडताळता येणार आहे. त्यामुळे दरमहा बिलिंग आणखी अचूक होणार आहे. मीटरचा फोटो अस्पष्ट घेणे, विविध कारणांमुळे मीटर रीडिंग घेता न येणे किंवा “नादुरूस्त’ शेऱ्यामुळे सरासरी किंवा अंदाजे युनिटच्या वीजबिलाचे सध्याचे प्रकार बंद होणार आहे. पर्यायाने चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप देखील टळणार आहे. या सर्व फायद्यांमुळे कोणताही गैरसमज न ठेवता आणि प्रीपेडची सक्ती नसलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा “टीओडी’ मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी केले आहे.





