प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे रखडलेली पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची (म्हाडा) घरांची सोडत, आचारसंहिता संपुष्टात येताच तात्काळ राबविण्यात येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुरू असलेल्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची (म्हाडा) बहुप्रतिक्षित घरांची सोडत (लकी ड्रॉ) सध्या रखडली आहे. या सोडतीसाठी तब्बल 4186 घरांकरिता 2 लाख 15 हजार 845 अर्जदारांनी अर्ज केले असून, अनामत रक्कम म्हणून सुमारे 448 कोटी रुपये जमा झाले आहेत. सप्टेंबर 2025 पासून जवळपास चार ते पाच महिने ही मोठी रक्कम पडून राहू नये, तसेच सोडतीनंतर अपात्र ठरणार्या 2 लाख 11 हजार 659 अर्जदारांचे सुमारे 440 कोटी रुपये तात्काळ परत मिळावेत, या उद्देशाने 23 डिसेंबर 2025 रोजी सभापवती आढळराव पाटील यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन सोडतीसाठी परवानगी मागितली होती. या भेटीत निवडणूक आयुक्तांनी संबंधित प्रस्ताव राज्याच्या मुख्य सचिवांच्या अखत्यारितील समितीमार्फत पाठवावा, असा सल्ला दिला होता. मात्र, हा प्रस्ताव अधिकृतपणे म्हाडा मुख्यालय, मुंबई येथून सादर होणे आवश्यक असताना तो अद्याप सादर झालेला नाही. दरम्यान, निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2025 रोजी पत्राद्वारे, या सोडतीतून मोठ्या प्रमाणावर घरांचे वाटप होणार असून त्यामुळे स्थानिक मतदार प्रभावित होऊ शकतात, या कारणास्तव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच सोडत काढावी, असा निर्णय देत परवानगी नाकारली आहे. “अर्ज प्रक्रियेदरम्यान सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन आणि स्क्रुटिनी प्रक्रियेला लागलेला विलंब यामुळे सोडत वेळेत होऊ शकली नाही. अखेर 24 डिसेंबर रोजी अर्जांची स्क्रुटिनी पूर्ण झाल्याची माहिती संबंधित सॉफ्टवेअर कंपनीकडून देण्यात आली. त्यामुळे म्हाडा प्रशासन सोडतीसाठी पूर्णतः सज्ज आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर कोणताही विलंब न करता ऑनलाईन पद्धतीने सोडत काढण्यात येईल, तसेच विजयी अर्जदारांबरोबरच उर्वरित अर्जदारांची अनामत रक्कम तात्काळ परत करण्यात येईल.” – शिवाजीराव आढळराव पाटील, सभापती पुणे म्हाडा