पुणे – मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले आहेत. त्यानंतरही शिवाजीनगर येथील बसस्थानकाचे काम रेंगाळले आहे. महामेट्रो प्रशासनाने ते काम तत्काळ सुरू करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत शिवाजीनगर बसस्थानक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील उड्डाणपूल कामांचा आढावा घेतला.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर यावेळी उपस्थित होते.
शिवाजीनगर बस स्थानकाच्या खालील बाजूस एसटी महामंडळाचे शिवाजीनगर बसस्थानक आहे. मेट्रो स्टेशनसाठी हे बसस्थानक वाकडेवाडी येथे गेल्या सहा वर्षांपासून स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर, मेट्रो स्थानकाचे काम संपून मेट्रो सुरू झाली तरी अद्याप स्थानकाचे काम झालेले नाही. हे स्थानक कोणी बांधायचे,निधी कोणी द्यायचा याचा वाद सुरू होता. अखेर हे काम महामेट्रोने करून देण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या.
त्यानुसार, महामेट्रोने त्यांच्या खर्चातून करावयाची कामे त्वरित सुरू करावी. उर्वरित इमारतीच्या कामासाठी राज्य शासनातर्फे निधी देण्यात येईल. राज्य परिवहन महामंडळाने इमारतीतील त्यांना आवश्यक जागेची माहिती द्यावी, इतर जागेत शासकीय कार्यालयासाठी जागा देण्याबाबत प्रशासनाने माहिती घ्यावी, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत.
पर्यायी रस्त्यावर छोटी वाहने
या बैठकीत पवार यांनी विद्यापीठ चौकातील काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीसाठीच्या पर्यायी रस्त्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी ब्रेमेन चौकातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या. या शिवाय कृषी महाविद्यालयातून सिंचननगर मधून पर्यायी रस्ता सुरू केल्यानंतर केवळ कार आणि दुचाकींसाठीच हा रस्ता असावा, अशा सूचनाही पवार यांनी केल्या आहेत.
कृषी महाविद्यालय ते सिंचन नगर मैदानाकडून जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि कारची वाहतूक वळविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. बसस्थानक कामाचा आराखडा प्राप्त झाला असून पुढील अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे श्री.हर्डीकर यांनी सांगितले.