Pune Metro – महामेट्रोने ४१ हजार झाडे लावण्याचा आणि पुढील सात वर्षे त्याची देखभाल-दुरुस्ती करण्याचा निर्णय घेऊन त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. आता ही झाडे लावण्यासाठी मेट्रोकडे जागा आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याविषयीच्या बातम्याही आल्या. आता ही झाडे कोणत्या स्वरूपाची लावणार, त्यांची उंची, वय काय, झाडे कुठे लावणार, झाडे तोडलेल्या झाडांच्या बदल्यात लावणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच याचा निर्णय निविदाधारकाने घ्यायचा की मेट्रोने घ्यायचा असे प्रश्न पर्यावरणप्रेमींनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना पत्राद्वारे विचारले आहेत. आपला परिसर संस्थेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी हे पत्र दिले आहे. महामेट्रोने ४१ हजार झाडे लावण्याची निविदा काढली असून ती २५ मार्च रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यावर आपला ४१ हजार झाडे लावण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. मेट्रोच्या कामादरम्यान जी झाडे काढावी लागली त्या बदल्यात ही झाडे लावण्याची निविदा आहे का, काढलेल्या झाडांबाबत पर्यावरण विभागाच्या निकषांनुसार झाडे लावणार का, ही झाडे कोणत्या ठिकाणी लावणार, याबाबतचा काही नकाशा उपलब्ध आहे का, असे प्रश्न पत्रात विचारले आहेत. या प्रक्रियेसाठी हाॅर्टिकल्चर किंवा लॅण्डस्केप सल्लागार नेमला होता का, कोणत्या स्वरूपाची झाडे लावणार याचा तपशील निविदेत का नाही, किती उंचीची, किती वर्षे वयाची झाडे लावायची आणि ती कोठे लावायची याचाही तपशील निविदेत नाही. याबाबतचा निर्णय ज्याला निविदा मिळाली त्याने घ्यायचा का, अन्य कोणी घ्यायचा, निविदेची अंतीम तारीख २७ एप्रिल होती, त्यानंतरही निविदा अद्याप का उघडल्या नाहीत, असेही प्रश्न पत्रात उपस्थित केले आहेत.