Pune Metro – मेट्रो कामांमुळे तोडल्या जाणाऱ्या २३८६ झाडांच्या बदल्यात सुमारे ४१ हजार झाडे लावण्याची योजना महामेट्रोने आखली असली, तरी त्यासाठी शहरात पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. वृक्ष लागवडीच्या जागेसाठी विविध सरकारी संस्थांना जागेची विचारणा करणारे पत्र महामेट्रो नुकतेच पाठवले आहे. त्यामुळे पुण्यातील मोकळ्या जागांच्या तीव्र टंचाईचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. शहरातच जागा नसताना ही झाडे नेमकी कुठे लावली जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे मेट्रोच्या दोन मार्गिका सध्या सुरू असून त्यांच्या विस्ताराची कामे सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारांसह खडकवासला-खराडी आणि नळस्टॉप-माणिकबाग या नव्या मार्गिकांचे कामही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे २३८६ झाडे बाधित होणार असून, महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या नुसार त्यांच्या बदल्यात सुमारे ४१ हजार झाडे लावणे बंधनकारक आहे. पुणे मेट्रो दरम्यान, तज्ज्ञांच्या मते भरपाई स्वरूपातील वृक्षलागवड कागदोपत्री चांगली वाटत असली तरी शहरी भागात तिची अंमलबजावणी प्रचंड कठीण ठरणार आहे. पुण्यासारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात मोकळ्या जागा कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी योग्य जागा उपलब्ध करणे ही मोठी अडचण ठरत आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, प्रौढ झाडांचे पर्यावरणीय योगदान नव्याने लावलेल्या रोपांद्वारे तत्काळ भरून निघू शकत नाही. त्यामुळे ४१ हजार झाडे हा आकडा प्रभावी वाटत असला, तरी त्याचा कितपत फायदा होईल हा प्रश्न आहेच. तसेच, विखुरलेल्या जागांवर लागवड केल्यास त्यांचे संगोपनही आव्हानात्मक ठरते. पुरेशी देखभाल न झाल्यास ही लागवड केवळ आकडेवारीपुरती मर्यादित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. याआधी मेट्रोच्या पहिल्या दोन मार्गिकांमुळे झालेल्या वृक्षतोडीच्या बदल्यात सुमारे २१ हजार झाडांची लागवड झाली होती. तर काही वृक्षांचे पुनर्रोपणदेखील त्यांनी केले होते. मात्र, लागवड केलेल्या २१ हजार झाडांपैकी बहुतांश झाडे जगलीचं नाही. यामुळे प्रत्यक्ष पर्यावरणीय भरपाई कितपत साध्य झाली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योग्य देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षणाचा अभाव ही झाडे न जगण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. परिणामी, केवळ लागवडीच्या आकड्यांपेक्षा झाडांच्या जिवंत राहण्याच्या प्रमाणावर अधिक भर देण्याची गरज अधोरेखित होत आहे.